आचार्य अत्रे यांच्या दुर्वा आणि फुले या लेखसंग्रहातून --- लोकमान्य टिळक (१)

लोकमान्य टिळक (१)

आज एक ऑगस्ट, एक ऑगस्ट ही तारीख कानावर आली किंवा या तारखेची आठवण झाली म्हणजे एकच महान विभूती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते, आणि ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची. वीस सालच्या एक ऑगस्टला रात्रौ बारा वाजून चोवीस मिनिटांनी मुंबई येथे सरदारगृहात लोकमान्य टिळक यांचे अवसान झाले. त्या गोष्टीला आज सत्तावीस वर्षे झाली.टिळकांच्या मरणाचे आणि त्यांच्या विराट स्मशानयात्रेचे ते हृदयभेदक दृश्य अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे. जणू काही कालच ती गोष्ट घडली असे मला वाटते. मी त्या वेळी मुंबईत होतो. "माधवाश्रमा" शेजारच्या एका इमारतीत राहत होतो. म्हणून त्या अलौकिक राष्ट्रपुरुषाचे अंत्यदर्शन घेण्याचे महद् भाग्य त्या वेळी मला लाभले. आज सकाळपासून सत्तावीस वर्षांपूर्वीच्या त्या शोकदायक दिवसाची आठवण मला होते आहे. त्याखेरीज दुसरा कोणताही विचार आज माझ्या मनामध्ये नाही. किंवा दुसरा कोठलाही विषय सुचण्याच्या मनःस्थितीत मी या वेळी नाही. म्हणून वाचकहो, त्या अविस्मरणीय दिवसाबद्दलच मी आज तुमच्याशी बोलावयाचे ठरविले आहे. टिळक त्या वेळी चौसष्ट वर्षांचे होते. सहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर ते जरी थकल्यासारखे दिसत होते, तरी त्यांची प्रकृती तशी काही वाईट नव्हती. त्यांचा आवेश आणि अवसान पूर्वीपेक्षा जास्त प्रखर झालेले होते.

त्यांना अकस्मात मध्येच मरण येईल अशी त्या वेळी तरी कोणाचीच कल्पना नव्हती. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना थोडासा हिवताप येऊ लागला. एवढ्यात मुंबई हायकोर्टात काहीतरी कायद्याचे काम निघाले म्हणून अंगात ताप असतानाही ते तसेच मुंबईला आले आणि सरदारगृहात उतरले. एके दिवशी सायंकाळी दिवाण चमनलाल यांनी आपल्या उघड्या मोटारीत त्यांना लांबवर समुद्रकाठी हिंडावयाला नेले. वास्तविक अंगात ताप असताना उघड्या वाऱ्यात टिळकांनी फिरावयास जायला नको होते. त्या संध्याकाळी एकच लहानशी चूक त्यांच्या हातून घडली. पण ती शेवटी प्राणघातक ठरली. हिंडून परत सरदारगृहात आल्यानंतर त्याच रात्री टिळकांच्या तापाने एकदम

उचल घेतली. आणि त्या रात्री ते जे अंथरुणावर एकदा पडले ते पुन्हा अखेरपर्यंत उठले नाहीत.

टिळक आजारी पडल्याची बातमी आरंभी फारशी कोणाला कळली नाही; पण त्यांच्या साध्या हिवतापाचे पर्यवसान जेव्हा निमोनियात झाले तेव्हा त्यांच्या आजाराची बातमी वणव्यासारखी साऱ्या शहरात पसरली. टिळकांचा हा शेवटचा आजार आठ-दहा दिवस टिकला. मुंबईमधील उत्तमोत्तम डॉक्टर मंडळी या काळात एकसारखी त्यांच्या बिछान्याजवळ बसून होती. वैद्यकीय उपायांची त्यांनी अगदी पराकाष्ठा करून सोडली, पण आठ-दहा दिवसात टिळकांचा हिवताप एवढासासुद्धा कमी झाला नाही. टिळकांचे हे दुखणे अखेरचे ठरणार आहे असे स्वप्नातसुद्धा कोणाला त्या वेळी वाटले नाही. चार-दोन दिवसांत त्यांचा ताप उतरेल. मग हवापालट करण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी ते कोठेतरी चांगल्या हवेच्या ठिकाणी जातील अशीच सर्वांची कल्पना होती. पण एक-एक दिवस जसा उलटू लागला आणि टिळकांचा ताप कमी होण्याचे लक्षण जसे दिसेनासे झाले तेव्हा मात्र लोकांचे धाबे दणाणून गेले. तरी देखील ऐन वेळी काहीतरी अद्भूत चमत्कार घडून टिळक त्या दुखण्यातून सुरक्षितपणे निभावून जातील, असा जनतेला मनामधून विश्वास वाटत होता. कारण टिळकांचे सारे जीवनच अद्भुतरम्य होते. अनेक चमत्कारांनी ते भरून गेलेले होते. टिळकांच्या हातून अद्याप कितीतरी लोकोत्तर पराक्रम घडतील अशी लोकांना आशा वाटत होती. टिळकांच्या आयुष्याचा शेवट बघण्याची कोणाच्याही मनाची तयारी नव्हती. पण जनतेची ही सारी स्वप्ने धुळीला मिळवून टाकण्याचा दैवाने मात्र जणू काही निर्धारच करून ठेवलेला होता.

त्या वेळची प्रसिद्धीकरणाची साधने आजच्या मानाने पुष्कळच अपुरी होती. तथापि टिळकांच्या प्रकृतीसंबंधीची बातमी घटकेघटकेला जनतेला कळविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. संदेशचे धुरंधर संपादक अच्युतराव कोल्हटकर यांचे आणि टिळकांचे संबंध शेवटी शेवटी फारच बिनसलेले होते. टिळकांवर अतिशय कडक टीका करून अच्युतरावांनी टिळकभक्त जनतेचा फारच मोठा रोष आपणांवर ओढवून घेतला होता. तथापि टिळकांच्या या शेवटच्या आजारात त्यांच्या प्रकृतीसंबंधीची ताजी बातमी लोकांना कळविण्यासाठी अच्युतरावांनी आपल्या संदेशच्या दोन-दोन आवृत्त्या काढून आपल्या उज्ज्वल टिळकप्रेमाची जनतेला खातरजमा करून दिली. टिळकांच्या प्रकृतीच्या समाचारासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी लोकांची महाराष्ट्रातून एकसारखी मुंबईकडे रीघ लागली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत साऱ्या हिंदुस्थानचे लक्ष मुंबई शहरातल्या सरदारगृहावर केंद्रित झाले होते. शेवटी शेवटी मुंबईकर जनतेच्या झुंडीच्या झुंडी सरदारगृहासमोर उभ्या राहून चिंतातूर दृष्टीने तासनतास सरदारगृहाच्या तिसऱ्या मजल्याकडे बघू लागल्या. सरदारगृहातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक माणसाचा चेहरा कसा दिसतो त्यावरून लोकमान्य टिळकांच्या प्रकृतीचा अंदाज बांधण्याचा बाहेर उभ्या असलेल्या लोकांना नादच लागून राहिलेला होता. वास्तविक टिळकांचा हा आजार एवढा काही भयंकर नव्हता. त्यांच्या अंगात शक्ती नव्हती म्हणूनच तो घातक ठरला. तापाशी झगडण्याचे त्राणच त्यांच्या देहात उरले नव्हते. त्यामुळे हळूहळू शक्तिपात होत गेला. आणि शेवटच्या तीन-चार दिवसांत त्यांना परिचयाची माणसेही ओळखू येईनाशी झाली. एकतीस जुलै रोजी शनिवार होता. त्या दिवशी संध्याकाळपासून टिळकांच्या प्रकृतीची डॉक्टरांनी आशा सोडली. ही बातमी शहरात एकदम कशी पसरली काही कळत नाही. पण रात्रौ दहा वाजेपर्यंत अक्षरशः लक्षावधी माणसे सरदारगृहासमोरच्या विस्तीर्ण रस्त्यावर जमा झाली. वरून पाऊस एकसारखा कोसळत होता. भोवताली चहूकडे भयाण अंधार पसरला होता. त्या पावसात आणि भयाण अंधारात व्याकूळ चेहरा करून आणि व्यथित मनाने मुंबईकर जनता तासनतास ताटकळत उभी होती. दहा वाजले, अकरा वाजले, बाराही वाजून गेले. काळोख एकसारखा वाढत होता. पाऊस जास्त जास्त कोसळत होता. रस्त्यावरची गर्दी अधिकाधिक पसरत होती. तथापि एवढी गर्दी   असूनही एवढासासुद्धा आवाज त्या गर्दीमधून निघत नव्हता.

आजारी माणसाच्या बिछान्याभोवती त्यांची आप्तमंडळी जशी शांतपणे बसलेली असतात तशाच जपणुकीच्या भावनेने सरदारगृहाभोवतीच्या काळोखात माणसे उभी होती. सरदारगृहाच्या तिस-या मजल्यावर जरा काही हालचाल झाली की विजेचे बटन दाबावे तसे हजारो चिंतातूर चेहरे श्वास रोखून एकदम वर बघू लागत. त्या गर्दीत एका झाडाखाली मी रात्री नऊ वाजल्यापासून उभा होतो.

माझ्याजवळ छत्री नव्हती. माझ्या अंगात एक गरम कोट होता. आत सदरा घालायचेही मी विसरलो होतो. माझे डोके आणि कोट भिजून चिंब झाला होता. माझ्या पलीकडे एक वृद्ध दाढीवाला हिंदू हातात जपमाळ घेऊन टिळकांच्या प्रकृतीला आराम पडो असा एकसारखा जप करीत उभा होता. साडेबारा वाजले. जुना दिवस संपून नव्या दिवसाला सुरुवात झाली. तेव्हा आता कदाचित संकट टळले असेल असा कोणाच्या मनात विचार येतो तोच एक मनुष्य वरून खाली येत असल्याचे दिसले. सरदारगृहासमोर पोर्चमध्ये थोडीशी काहोतरी हालचाल झाली आणि `गेले' हा एकच शब्द अस्पष्टपणे कोणीतरी कुजबुजले. पण कोणीतरी कोणाच्या तरी कानात भीत भीत कुजबुजलेला तो एकच अशुभ शब्द एकाच वेळी लक्षावधी लोकांना ऐकू आला. त्याबरोबर `गेले, गेले' असे त्या शब्दाचे शेकडो पडसाद रुद्ध स्वरामध्ये चहूकडून आले. हृदयात कसलातरी जबर घाव बसावा असे प्रत्येकाला वाटले. पाय जागच्या जागी खिळल्यासारखे झाले आणि सर्वांच्या डोळ्यापुढे अंधारी आली. बाकीचे सारे मुंबई शहर त्या वेळी झोपलेले होते. पण तास-दीड तासाच्या आतच टिळकांच्या मृत्यूची दुःखकारक वार्ता ऐकून सारे शहर अंथरुणातून उठले. पहाटे तीन वाजल्यापासून तो सकाळी सात वाजेपर्यंत सारी मुंबईकर जनता आपआपल्या घरात जागी होऊन अश्रू ढाळीत होती. बाहेर आभाळ रडत होते. वारा कण्हत होता आणि घराघरात जनता स्फुंदत होती.

मी सरदारगृहासमोर सकाळपर्यंत तसाच बसून राहिलो होतो. वर जवळ जाऊन टिळकांचे शेवटचे दर्शन घेण्याची माझी इच्छा होती. साडेसहा-सात वाजण्याच्या सुमारास टिळकांचा मृतदेह सरदारगृहाच्या गॅलरीत आणून ठेवण्यात आला. त्यांच्या अंगावर शालजोडी घातलेली होती. कपाळाला भस्म लावलेले होते आणि गळ्यात फुलांचे हार घातलेले होते. या सुमारास सरदारगृहाच्या जिन्यावर गर्दी कमी होती. म्हणून मी मनाचा निश्चय करून चटकन वाट काढीत वर गेलो आणि टिळकांच्या शवासमोर जाऊन उभा राहिलो. डोळे शांतपणे मिटून चिरनिद्रित झालेल्या लोकमान्यांचा तो निश्चल चेहरा बघून माझ्या हृदयात विलक्षण कालवाकालव झाली. पंधरा सालच्या फेब्रुवारी महिन्यात नामदार गोखले यांचे शव मी जवळून पाहिले होते. गोखल्यांचा चेहरा मरणानंतरही अत्यंत तेजस्वी आणि सुंदर दिसत होता पण टिळकांचा मृत चेहरा निस्तेज आणि जर्जर दिसत होता. त्यांच्या श्यामल वर्णाचे तेज निघून गेले होते. गीतारहस्याच्या प्रस्तावनेच्या आरंभी त्यांनी उल्लेखिलेल्या कारुण्यपूर्ण श्लोकाची मला आठवण झाली. 'कृतांतकटकामलध्वजजरा दिसो लागली |पुरस्सरगदांसवे झगडता तनू भागली.' होय, व्याधीशी झगडता झगडता लोकमान्यांची तनू खरोखरच थकूनभागून गेली होती. अधिक वेळ त्या ठिकाणी उभे राहावयास अवकाश नव्हता. त्यांच्या चरणाला स्पर्श करून मी चटकन तेथून बाहेर पडलो. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टिळकांच्या विराट स्मशानयात्रेला सुरुवात झाली.

टिळकांचे मृत शरीर कदाचित पुण्यास नेले जाईल अशा त-हेची बातमी त्या दिवशी सकाळी पसरली होती. सकाळपासून टिळकांच्या शवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सरदारगृहासमोर अलोट गर्दी जमू लागली. शहरातली सारी दुकाने आणि कारखाने आपोआप बंद पडले. टिळकांचा अंत्यविधी चौपाटीच्या विस्तीर्ण वाळवंटात होण्याचे ठरलेले ऐकून मुंबईकर जनतेला बरे वाटले. मुंबईच्या इतिहासात चौपाटीच्या वाळवंटात तो पहिलाच अग्निसंस्कार होता. आदल्या रात्रीपासून पाऊस जो सुरू झालेला होता तो संध्याकाळ होईपर्यंत थोडासुद्धा कमी झाला नाही. सरदारगृहापासून दुपारी दोन वाजता निघालेली स्मशानयात्रा संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास चौपाटीजवळ येऊन पोचली. यात्रा ज्या ज्या रस्त्यांनी गेली ते ते रस्ते गर्दीने अगदी तुडुंब भरून गेले. त्या जनसमुहाला एक- एक पाऊल पुढे टाकायला दहा-दहा, पंधरा-पंधरा मिनिटे वेळ लागत होता. एका उच्च आसनावर सर्वांना नीट दिसेल अशा त-हेने टिळकांचे शव ठेवले होते आणि त्यावर फुलांची एकसारखी वृष्टी होत होती. टिळक हे 'लोकमान्य' कसे हे त्या दिवशी सर्वांना दिसून आले. लक्षावधी लोकांच्या मिरवणुकीच्या अग्रभागी उच्चासनावर अधिष्ठित झालेली टिळकांची धीरगंभीर मूर्ती लांबून पाहणारास असे वाटले असते की जनतेच्या हृदयसिंहासनावर हा जणू काही कोणी बादशहाच विराजमान होऊन चाललेला आहे. चौपाटीच्या वाळवंटावर स्मशानयात्रा येताच जनसमूहाने फारच विशाल आणि अमर्याद स्वरूप धारण केले. जनसागरातल्या आणि जलसागरातल्या लाटा उसळण्यास सुरुवात होऊन त्या दोन सागरांची जणू काही परस्परांशी स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर प्रत्यक्ष पाहण्यासारखे असे काहीच राहिले नाही. लोक अंधारात जागच्या जागी निश्चलपणे बसून राहिले होते. त्यानंतर एक गडद धुम्ररेषा वाळवंटामधून उठली आणि त्यामागून काही ठिणग्या आणि ज्वाळा वर उसळल्या. पंचवीस वर्षे ज्या स्वातंत्र्यसिंहाने आपल्या गगनभेदी गर्जनेने कोट्यवधी हिंदी जनता जागी केली होती त्याने महासागराला आणि जनसागराला साक्षी ठेऊन आपल्या आवडत्या मातृभूमीचा अखेर निरोप घेतला . सुन्न मस्तकांनी लक्षावधी लोक मुकाट्याने उठले आणि दुःखाचे निश्वास टाकीत घरोघर चालते झाले. त्याच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुंबईत एका ठिकाणी महात्मा गांधीनी आपल्या असहकाराची घोषणा केली. देशाच्या राजकीय रंगभूमीवरून लोकमान्यांनी ज्या क्षणी प्रयाण केले त्याच क्षणी गांधीजीनी त्या रंगभूमीवर दुस-या बाजूने प्रवेश केला. जनतेच्या स्वातंत्र्याची मशाल टिळकांनी खाली पडू दिली नाही. जाता जाता ती त्यांनी गांधीजींच्या हाती देऊन टाकली. हिंदी स्वातंत्र्याच्या इतिहासात, एक ऑगस्ट हा दिवस अविस्मरणीय आहे. टिळकयुगाचा आणि गांधीयुगाचा तो एक महान संधिकाल आहे. तो संधिकाल पाहण्याचे भाग्य माझ्याप्रमाणे ज्यांना लाभले ते धन्य होत.

 

 

Advertisement

  • even news-new
  • even news-new