लोकमान्य टिळक (३)
लोकमान्य टिळकांचे आयुष्य अनेक नाट्यपूर्ण प्रसंगांनी भरलेले आहे. अर्थात हे सारे प्रसंग वीररसाचे आणि उदात्तरसाचे आहेत. दुसऱ्या रसाला त्यांच्या झुंजार जीवनात मुळी जागाच नव्हती. पण असे असूनही त्यांच्या आयुष्यात एकदा एक मौजेचे हास्यरसपूर्ण प्रकरण घडले. त्याची आठवण झाली म्हणजे मला खूपच हसू येते. खरोखर, आमचे पुणे म्हणजे एक अजब गाव आहे. ह्या गावात आजपर्यंत एकाहून एक विक्षिप्त अशा काय काय अद्भुत वल्ली जन्माला येऊन गेल्या असतील म्हणता ! त्या सगळ्यांचा इत्यंभूत इतिहास एकदा कोणीतरी लिहिण्यासारखा आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात पुणे शहरात एक अशीच विचित्र व्यक्ती होती. हिचे नाव बाळासाहेब नातू. त्या वेळी पुण्यात दोन नातू प्रसिद्ध होते. एक बाळासाहेब व दुसरे तात्यासाहेब. तसे दोघेही ‘नातू’ काही अगदीच ‘बाळाजीपंत नांतू’ च्या वंशात शोभण्यासारखे नव्हते. दोघांच्याही मनात देशाबद्दल अतोनात प्रेम होते. इंग्रजांची सत्ता ह्या देशातून नाहीशी व्हावी असे दोघांनाही तळमळीने वाटत होते. विशेषतः तात्यासाहेब हे जास्त जहाल होते. ते घोड्यावर बसण्यास मोठे पटाईत होते. गावातील निवडक तरुण जवानांना जमा करून त्यांना घोड्यावर बसावयाला शिकवण्याचा त्यांना अतिशय नाद होता. सरकारविरुद्ध बंड करण्याकरिता शस्त्रास्त्रांचा गुप्त साठा कोठेतरी ते करून ठेवीत असावेत असा सरकारला वहीम आलेला होता. म्हणूनच अठराशे सत्त्याण्णव सालच्या जूनमध्ये पुण्यात रँडसाहेबाचा खून झाल्यानंतर अठराशे सत्तावीसच्या पंचविसाव्या कलमान्वये दोघाही नातूंना चौकशी न करता सरकारने कित्येक महिने डांबून ठेवले होते. त्या त्यांच्या अटकेचा त्या वेळी विलायतेपर्यंत फार मोठा गवगवा झाला. तेव्हा तसे म्हणाल तर हे नातूद्वय मोठ्या निधड्या छातीचे होते.
पण त्यापैकी बाळासाहेब नातू जे होते, ते पुण्यातील बुरसलेल्या सनातनी ब्राम्हणांचे अगदी कट्टर पुढारी होते. सनातन्यांचे पुढारी होण्याची तशी काही त्यांची लायकी नव्हती. ते काही विद्वान नव्हते किंवा पढिकही नव्हते. धर्मशास्त्राचे एक अक्षरदेखील त्यांना कळत असेल तर शपथ. पण धर्म म्हटला की भांग प्याल्याप्रमाणे डोळे लाल करून तावातावाने बोलत सुटत. त्यांच्या धर्माभिमानाला हेकटपणा आणि दुराग्रह ह्यांच्याखेरीज दुसरा कसलाही आधार नव्हता. आणि एकदा एखादी गोष्ट त्यांच्या डोक्यात शिरली की प्राण गेला तरी ती ते सोडत नसत. ह्या मूर्ख हटवादीपणामुळेच त्यांनी एका प्रकरणी साऱ्या गावात आपली फटफजिती करून घेतली. तीच गोष्ट आज मला सांगायची आहे. टिळक आणि बाळासाहेब नातू हे तसे मित्र होते. दोघांनीही एकत्र येऊन अनेक सार्वजनिक कामे केलेली. दोघांनाही एकमेकाबद्दल पुष्कळच आदर. पण धर्माच्या बाबतीत मात्र दोघांचे विस्तव आणि पाणी ह्यांच्यासारखे वैर. लोकमान्य टिळक हे धार्मिक बाबतीत सनातनी किंवा जुन्या मताचे असावेत अशी आज आपली समजूत आहे. पण तसे ते नव्हते. त्या काळी त्यांची धार्मिक आणि सामाजिक विचाराची भूमिका अशी काही होती, कि ते धड जुन्यातही मोडत नसत आणि नव्यातही जमा होत नसत. त्यामुळे गावातले सनातनी आणि सुधारक असे दोन्हीही पक्ष त्यांना शत्रूप्रमाणे लेखीत असत. जुन्या धर्माचारांत आणि सामाजिक व्यवहारांत काळानुसार अनेक बदल करावयाला पाहिजेत असे जेव्हा टिळक आग्रहाने म्हणत, तेव्हा सनातनी दात-ओठ खाऊन उठत व ह्या माणसाला सनातन धर्माचा मुळीच अभिमान नाही असे म्हणत. त्याचप्रमाणे सामाजिक सुधारणा ही लोकमतात इष्ट तो बदल करून घेऊन हळूहळू घडवून आणली पाहिजे असे सांगून टिळक जेव्हा सामाजिक कायद्यांना विरोध करीत, तेव्हा गावातले सुधारक लोक टिळकांवर तुटून पडत, आणि ह्या माणसाचे सारे इंग्रजी शिक्षण वाया गेले हो गेले असे ते गिल्ला करू लागत.
टिळकांच्या ह्या स्वतंत्र मताप्रणालीमुळे गावामधल्या सनातन्यांना आणि सुधारकांना त्या वेळी त्यांची मोठीच अडचण होऊन राहिली होती. सनातनी म्हणत कि ह्या टिळकांच्या तोंडावरचा सनातनी मताचा बुरखा ओढून काढून तो एक बाडगा सुधारक आहे असे आपण एखाद्या दिवशी सिद्ध करून दाखवल्यावाचून कधी राहणार नाही. तर सुधारक म्हणत कि हा टिळक अंतःकरणातून सामाजिक सुधारणेचा कट्टा दुष्मन असून सुशिक्षितांमध्ये संभावितपणे वावरणारा तो एक छुपा सनातनी आहे असे आपण एक दिवस जगाच्या निदर्शनाला आणू ! सनातनी आणि सुधारक ह्यांचा टिळकांशी चाललेला हा बेबनाव पुढे पुढे इतक्या थराला जाऊन पोचला, कि सुधारकांचे एक पुढारी रावबहादूर भिडे हे वैतागून एकदा म्हणाले, " टिळक स्वर्गवासी होतील तेव्हाच आमचा हा तंटा मिटेल !" तर सनातन्यांचे कट्टर पुढारी श्री. बाळासाहेब नातू ह्यांनी एका दिवशी आपल्या मिशांना पीळ देऊन भीष्मपेक्षाही एक भयंकर आणि विलक्षण प्रतिज्ञा केली, कि नाही मी ह्या बळवंतराव टिळकांच्या मिशा त्याच्या ओठांवरून भादरून काढल्या तर मी नावाचा बळवंतराव नातूच नव्हे !" टिळकांच्या आयुष्यात त्यांची अनेक तऱ्हेने मानहानी आणि विटंबना करू इच्छिणारे त्यांचे अनेक प्रतिस्पर्धी होऊन गेले असतील, पण टिळकांच्या क्षौर करावयाला लाऊन त्यांची साऱ्या गावात फजिती करू इच्छिणारा बाळासाहेब नातू हा त्याच्या चरित्रात एकटा एकच विक्षिप्त गृहस्थ होऊन गेला. या जगात कोणाला काय नाद असतो आणि कोणाला काय नाद नसतो हे काही सांगता येत नाही. टिळकांच्या मिशा उतरवून त्यांचा हास्यास्पद चेहरा जगाला दाखविण्याच्या ह्या बाळासाहेब नातूंच्या विलक्षण नादाला काय म्हणावे बरे ! एकदाच नव्हे, पण अनेकदा आणि अनेक वर्षे हा 'नातू' टिळकांच्या मिशांच्या मागे एखाद्या 'केतू' प्रमाणे लागून राहिलेला होता. लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातले एक हास्यरसपूर्ण प्रकरण म्हणून मी मघाशी ज्याचा उल्लेख केला ते हेच प्रकरण ! ह्या प्रकरणात शेवटी बाळासाहेब नातूंनी स्वतःचीच बिनपाण्याने चांगली हजामत करून घेतली. आणि टिळकांच्या एका केसालाही पण धक्का लागला नाही. तुम्ही विचारलं कि, टिळकांच्या मिशा उतरविण्याची ही चमत्कारिक महत्त्वाकांक्षा बाळासाहेब नातूंच्या डोक्यामध्ये उत्पन्न होण्याचे कारण तरी कसे निर्माण झाले ? कसे निर्माण झाले ते आता सांगतो.....
त्याच वेळी पुणे शहरात गोपाळराव जोशी नावाची दुसरी एक महान विक्षिप्त वलली राहत होती. या गोपाळरावाच्या विक्षिप्तपणाच्या सगळ्याच गोष्टी सांगायच्या म्हणजे ते एक लांबलचक आख्यानच होईल. हा गृहस्थ अत्यंत कुस्तित आणि कुचेष्टेखोर होता. काहीतरी जगावेगळे करून लोकांना हसवण्याचा याला नादच लागलेला होता. पाणचट आणि फटकळ बोलण्यामध्ये तर त्याचा हात धरणे अशक्य होते. तथापि, वृत्तीने तो आधुनिक आणि सुधारणाप्रेमी होता. धर्म हे थोतांड आहे आणि धर्मांतराचा विधी हे एक निव्वळ ढोंग आहे हे दाखविण्यासाठी ह्याने स्वतःवर एक विलक्षण प्रयोग करून घेतला. एके दिवशी हा उठला आणि मशिदीत जाऊन मुसलमान झाला. त्यानंतर दोन दिवसांनी बास्माप्ति घेऊन तो ख्रिस्ती झाला, आणि आणखी दोन दिवसांनी प्रायश्चित घेऊन तो पुन्हा पहिल्यासारखा हिंदू झाला. आणि त्यानंतर मुसलमान, ख्रिस्ती आणि धर्मगुरूंसमोर जाऊन टवाळखोरपणाने तो बढाई मारू लागला कि 'कोणत्याही धर्मांतराने माझ्यात कसलाही बदल झालेला नाही. मी हिंदूचा मुसलमान झालो नाही, मुसलमानाचा ख्रिस्ती झालो नाही आणि ख्रिस्त्याचा पुन्हा हिंदूही झालो नाही. मी पहिल्याने होतो तसाच अद्यापिही कायम आहे !, अशा या इब्लिस माणसाने एक्याणव साली पुण्यातील भेकड सुशिक्षितांची व सुधारकांची फजिती करण्यासाठी एक अजब युक्ती शोधून काढली. त्याने पुण्यातील पंच हौद मिशनच्या ख्रिस्ती मिशनरयांकडून गावातील पाच - पन्नास सुशिक्षित हिंदू लोकांना काही चर्चा करण्यासाठी म्हणून आमंत्रणे धाडली. आणि चर्चा संपल्यानंतर सर्वांच्या पुढे अचानकपणे चहा आणि बिस्किटे आणून ठेवण्याची मोठ्या कौशल्याने व्यवस्था करविली. असा काही खाण्यापिण्याचा प्रकार शेवटी असेल अशी आमंत्रितांपैकी कोणाचीही कल्पना नव्हती. बरे, समोर आलेल्या गोष्टी निक्षून नाकारण्याचे धैर्य कोण्याच्याही अंगी नव्हते. तेव्हा काही थोडेजण चहा प्याले आणि काहींना कप तोंडाला लावून चहाचा एखादा - दुसरा घोट घेतल्यासारखे केले. गोपाळराव जोश्याला एवढेच पुरेसे होते. त्याने गावातल्या ' पुणे वैभव ' नावाच्या एका सनातनी वृत्तपत्राकडे लगेच धाव घेतली आणि पंच हौद मिशनमध्ये चहा पिऊन आपली जात बुडविणा-या बाडग्या सुधारकांची नावे त्यामध्ये प्रसिध्द करविली .
या गोष्टीमुळे पुण्यामधल्या सनातनी मंडळीत खूपच खळबळ उडाली. ख्रिस्तांच्या हाताचा चहा पिणाऱ्या मंडळींत महादेव गोविंद रानडे, गोविंदराव कानिटकर, सीतारामपंत देवधर, बाळ गंगाधर टिळक व वासुदेवराव जोशी अशी मोठमोठी माणसे होती. रानड्यांसारख्या प्रकट आणि टिळकांसारख्या प्रच्छन्न सुधारकांवर सूड उगविण्याचा हा चांगला मोका चालून आला आहे हे बघून सनातन्यांचे पुढारी बाळासाहेब नातू हे तर आनंदाने नाचू लागले आणि त्याच क्षणी टिळकांच्या मिशा उतरवून दाखविण्याची भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केली. सनातनी ब्रम्हवृंदाच्या वतीने त्यांनी चहा पिऊन बाटलेल्या मंडळींविरुद्ध शंकराचार्यांपुढे एक फिर्याद गुदरली त्याप्रमाणे शंकराचार्यांनी आपल्यातर्फे दोन शास्त्रांचे एक 'ग्रामण्य कमिशन' नेमून ते पुण्याला पाठवून दिले. नंतर रीतीप्रमाणे या कमिशनपुढे फिर्यादीच्या साक्षीपुराव्याचे काम सुरु झाले. प्रतिवादी मंडळी आपली जात मोडण्यासाठी चहा पिण्यास मिशनमध्ये गेली हा वादी पक्षाच्या फिर्यादीतील मुख्य मुद्दा होता. तथापि या मुद्द्यांवर पुरावा देण्याचे मात्र वादींनी साफ नाकारले. कारण प्रत्यक्ष चहापान घडले तेव्हा वादी पक्षाच्या विश्वासातला कोणीही साक्षीदार त्या ठिकाणी हजर नव्हता. त्या वेळी हजर असलेला माणूस एकच आणि ती म्हणजे गोपाळराव जोशी. पण गोपाळरावाला साक्षीसाठी बोलवण्याची वादी पक्षाची छातीच झाली नाही. कारण तो चावट माणूस आपल्या बाजूने साक्ष देईलच असा वादींना भरंवसा नव्हता. म्हणून 'पुरावाबिरावा जे काही पाहिजे आहे ते सगळे आमच्या फिर्यादीत आहे' असे आडमुठेपणाने वादी पक्ष सांगू लागला. धर्मग्रंथांचा भलामोठा भारा बांधून टिळक या कमिशनपुढे हजर झाले आणि दंड थोपटून त्यांनी शास्त्राधाराचा वाद सुरु केला. त्यामुळे वादी पक्षाला अगदी पळता भुई थोडी झाली. टिळकांचे मुख्य म्हणणे असे होते की ' परधर्मीयांच्या हातचा चहा पिण्याबद्दल धर्मग्रंथात प्रायश्चित सांगितलेले नाही. आणि शास्त्रात ज्याला प्रायश्चित सांगितलेले नाही तो मुळी दोषच होऊ शकत नाही. बरे, पूर्वजांना माहित नसलेल्या पदार्थाचे सेवन करणे हा जर अपराध होत असेल, तर बटाटे खाणे हाही अपराधच होईल. कारण आमच्या पूर्वजांना बटाटे माहित नव्हते. ते अमेरिकेतून या देशात आले. ब्राह्मणाखेरीज इतरांच्या हातचा चहा पिण्याने जात बाटते म्हणावी तर त्यांच्याच हातचा बर्फ खाण्याने आणि सोडा वॉटर पिण्याने ब्राह्मण का बाटत नाहीत ?' टिळकांच्या या कोटीकमाने सनातनी लोक अगदी चारीमुंडे चीत झाले. विशेषतः अब्राह्मणाच्या हातचे अन्नपाणी घेणाऱ्याला शास्त्रामध्ये जी प्रायश्चित्ते सांगितली होती त्यांत 'क्षौर' कोठेही नव्हते ! ते बघून तर बाळासाहेब नातू अगदी गडबडून गेला. कारण त्यांचा सारा कटाक्ष टिळकांच्या मिशांवर होता. या प्रकरणात टिळकांच्या मिशा आपण भादरल्याखेरीज राहणार नाही अशी आपल्या मिशीवर ताव देऊन ते शनिवार पेठेतल्या मारुतीसमोर आधीच प्रतिज्ञा करून बसले होते.
शेवटी एकदाचा ग्रामण्य कमिशनने आपला निकाल जाहीर केला. त्यात जात मोडण्यासाठी म्हणून प्रतिवादी मुद्दाम मिशनमध्ये चहा पिण्यासाठी गेले हा फिर्यादी पक्षाचा मुख्य आरोप कमिशनने नाशाबित ठरविला. आणि बिस्किटे खाल्ली हा त्यांच्यावरचा आरोप तर सिद्धच झाला नाही असा निकाल दिला. तथापि चहा पिऊन ब्राह्मणधर्माविरुद्ध वर्तन केल्याबद्दल प्रतिवादींना कमिशनने निरनिराळी प्रायश्चिते सांगितली. पण टिळक मात्र या प्रायश्चित्तेच्या शिक्षेतून सहीसलामत सुटले. कारण मिशनमध्ये चहा प्याल्यानंतर काशीस जाऊन आपण योग्य ते प्रायश्चित्त घेतले असल्याचा ठणठणीत पुरावा टिळकांनी शेवटच्या घटकेला कमिशनापुढे सादर केला. तो पाहून सनातनी ब्रह्मवृंद सपशेल चाट पडला ! टिळक केव्हा मध्येच गुपचुपपणे काशीला गेले आणि तेथे प्रायश्चित्त घेऊन परत आले ह्याची पुण्यात गंधवार्तादेखील कोणाला नव्हती. काशीसारख्या क्षेत्राला जाऊन टिळकांनी प्रायश्चित्त घेतले असल्यामुळे आता पुन्हा त्यांनी प्रायश्चित्त घेण्याची जरुरी नाही असा कमिशनने निर्णय दिला. तो ऐकून बाळासाहेब नातूंनी तर आपली मनगटे कडाकडा चावली. पुणे शहरात टिळकांचे क्षौर घडवून आणण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा सपशेलच कोलमडून पडली ! तेव्हा ग्रामण्य कमिशनमधल्या दोघा शास्त्र्यांना पैसे चारून टिळकांनी निकाल आपल्यासारखा करवून घेतला असा त्यांनी गावात गिल्ला करण्यास सुरुवात केली. ग्रामण्य कमिशनच्या निर्णयाने चहाच्या प्याल्यातून निर्माण झालेले हे पुण्यातले वादळ शांत होण्याऐवजी अधिकच वाढले. आणि त्यामुळे पुण्यातल्या ब्राह्मणांत 'शुक्ल ', आणि 'कृष्ण' असे दोन पक्ष निर्माण झाले शुक्ल म्हणजे पांढरे, धुतल्या तांदूळासारखे आणि कृष्ण म्हणजे काळे मळकट, बाटलेले. या दोन पक्षांमुळे गावातल्या भटाभिक्षुकांची मोठी धांदल उडाली. कारण कृष्णपक्षीय ब्राह्मणांच्या घरी धर्मकृत्ये करायला जे जातील त्यांना आपण वाळीत टाकू अशी बाळासाहेब नातूंनी गावातल्या साऱ्या भटांना तंबी दिली. त्यामुळे बिचाऱ्या भिक्षुकांची दक्षिणा बुडाली व ते अगदी हैराण होऊन गेले. कृष्णपक्षी ब्राह्मणांच्या घरी जेवायला जाणेदेखील सामान्य ब्राह्मणांना धोक्याचे होऊन बसले. ह्याच सुमारास टिळकांच्या घरात त्यांच्या थोरल्या मुलाची मुंज आणि मुलीचे लग्न निघाले. त्या कार्याला त्यांना गावात ब्राह्मण मिळेनासे झाले. कसबा पेठेतल्या गणपतीला त्यांना गुपचूप अक्षता देऊन यावे लागले. भटभिक्षुक न आल्याने टिळकांचे काही अडण्यासारखे नव्हते. कारण त्यांना धर्मकृत्याचे मंत्रबिंत्र सर्व पाठ येत होते. हे काम त्यांनी स्वतः चालविले असते. पण स्वयंपाकासाठी त्यांना आचारी मिळणे मुश्कील झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नीला आजूबाजूच्या शेजारणी बोलावूनच स्वयंपाक करवून घ्यावा लागला. या काळात बाळासाहेब नातूंनी टिळकांना अनेक वेळा निरोप पाठविला कि "मुकाट्याने क्षौर करून प्रायश्चित्त घ्या. मग तुमच्यासारखी ही बंधने आम्ही उठवितो !" पण टिळक काही त्यांना हार गेले नाहीत. तेव्हा बाळासाहेब नातू प्रभृती सनातनी मंडळींनी शंकराचार्यांकडे पुन्हा ' अपील' केले. शंकराचार्यांनी पुन्हा चौकशीचे काम सुरु करून कुरुंदवाडचे अधिपती बापूसाहेब आणि त्यांचे बंधू बाळासाहेब कुरुंदवाडकर आणि शंकराचार्याचे कारभारी असे तिघांचे नवीन कमिशन नेमले. मात्र ह्या वेळी बाळासाहेब नातूंनी एक हुषारी केली. ती ही कि, त्यांनी ह्या कमिशनमधल्या कारभाऱ्याला चांगलेच वश करून घेतले. नव्या कमिशनमधल्या कुरुंदवाडकर बंधूंनी निर्णय दिला खरा. पण तो अगदीच गुळमुळीत दिला. 'शंकराचार्यांना जे योग्य वाटेल ते त्यांनी करावे' असे त्यांनी आपले मत दिले. पण कमिशनमधल्या शंकराचार्यांच्या कारभाऱ्याने मात्र सनातन्यांच्या बाजूने ठणठणीत आपला अभिप्राय दिला. "काशीला जाऊन घेतलेले प्रायश्चित्त जमेला न धरता टिळकांनी सक्षौर प्रायश्चित्त घेतले पाहिजे. एक वेळ डोक्याचे मुंडण नाही केले तरी चालेल, पण ओठावरच्या मिशा त्यांनी काढल्याच पाहिजेत". असा कारभाऱ्यांनी आपला निवाडा दिला. हा निवाडा कारभाऱ्याकडून कोणी लिहवून घेतला असला पाहिजे हे सांगण्याची मुळी जरुरीच नाही.
कमिशनच्या ह्या भिन्न निर्णयामुळे शंकराचार्य बुचकळ्यात पडले व त्यांना पुढे काय करावे हे कळेनासे झाले. तेव्हा कारभाऱ्याने त्यांना चांगलाच दम भरला कि, " मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही टिळकांना मिशा काढण्याचे प्रायश्चित्त दिले नाही तर मी तुमच्या नोकरीचा राजीनामा देईन !" म्हणजे बाकीचे सगळे बाजूला राहिले अन शंकराचार्य न त्यांचे कारभारी यांची चांगलीच जुंपली. त्यामुळे हे सर्व प्रकरण दोन वर्षे भिजत पडले. पण त्याचा परिणाम असा झाला की टिळकांच्या मिशांवरचे गंडांतर मात्र त्यामुळे टळले. पुढे लोकच कंटाळून कंटाळून हे प्रकरण विसरून गेले. शंकराचार्य आणि त्यांचे कारभारी यांच्या मारामारीचे पुढे काय झाले हे कळायला काही आता मार्ग नाही. लोक विसरले, पण बाळासाहेब नातू काही विसरले नाहीत. टिळकांच्या मिशांवरचा त्यांचा रोष शेवटपर्यंत शाबूत राहिला.
मध्यंतरी अनेक सार्वजनिक कामांनिमित्त टिळक आणि नातू एकत्र आले. राजकीय चळवळीत दोघेही तुरुंगात जाऊन आले. त्याने मागले सारे वाद आणि भांडणे जवळजवळ ते विसरूनच गेल्यासारखे झाले. पुढे एकोणीसशे साली, म्हणजे मागल्या प्रकरणानंतर तब्बल आठ वर्षांनी, टिळकांच्या वाड्यात एकदा वसंतपूजेचा समारंभ होता. त्या समारंभाला टिळकांनी बाळासाहेब नातूंना रीतीप्रमाणे आमंत्रण दिले. त्याबरोबर टिळकांच्या मिशांवरच्या नातूंच्या मनातल्या रोषाने पुन्हा उचल घेतली. त्यांनी टिळकांना पत्र लिहून कळविले, "मिशन हाउसमध्ये जाऊन चहा प्याल्याबद्दल आणि मध्यंतरीच्या काळात आपल्या हातून जे अनेक भोजनदोष घडले असतील त्याबद्दल आपण सक्षौर आणि शास्त्रोक्त प्रायश्चित घेतले पाहिजे असे आपणास अजून तरी वाटते आहे काय ?" त्याला टिळकांनी सडेतोड उत्तर दिले की, " जे काही झाले ते आपणास ठाऊक आहे. माझ्यात आतबाहेर असे काही नाही. आपल्या मर्जीस वाटेल ते आपण करावे." अशा त-हेने टिळकांच्या मिशा उतरविण्याचा तोही मोका टळला आणि बाळासाहेब नातू आपल्या घरी स्वतःच्या मिशांचे केस तोडीत बसले.
टिळकांच्या मिशा काढण्याची ही बाळासाहेबांची महात्त्वाकांशा शेवटपर्यंत पुरी झाली नाही. ह्याबाबत श्री. न. चिं. केळकर 'टिळक चरित्र लिहितात की, "जगात मनुष्याला एकेक गोष्ट प्रिय असते ती त्याचा जन्म गेला तरी जात नाही. टिळक व नातू ह्यांचा स्नेह आजन्म टिकला. पण नातूंनी टिळकांना एका गोष्टीची बहाली कधीही केली नाही, ती त्यांच्या मुखश्मश्रुची !"