आचार्य अत्रे यांच्या दुर्वा आणि फुले या लेखसंग्रहातून --- लोकमान्य टिळक (२)

 

लोकमान्य टिळक (२)

महापुरुषांबद्दल आदर जसा मोठा तसा त्यांच्याबद्दलचा गैरसमजही मोठा. पंचमहाभूतांचे गुणधर्म जसे प्रसिद्ध आहेत तसे महापुरुषांचे स्वभावधर्मही ठरलेले असतात. त्यांच्या गंभीर स्वभावाला दुसा-याही अनेक कोमल बाजू असू शकतात याची सामान्यजनांना कल्पना नसते. अग्नी हा दाहक असतो; पण अग्नी हा शीतल असतो का ? पर्वत हा कठोर आणि उत्तुंग असतो; पण पर्वत हा कोमल असतो का ? सिंह हा क्रूर आणि शूर असतो; पण सिंह हा प्रेमळ असतो का ? लोकमान्य टिळकांचे चरित्र मी परवा वाचीत होतो. ते वाचून हे विचार माझ्या मनात आले. सामान्यतः टिळकांची आठवण झाली म्हणजे डोळ्यापुढे सिंहाची मूर्ती उभी राहते. खरोखर टिळक हे सिंहाप्रमाणे शूर, पराक्रमी आणि निधड्या छातीचे होते. जनतेच्या हृदयावर राज्य करण्यासाठीच ते जणू काही जन्माला आले होते. शत्रूंना जसे त्यांचे भय वाटे; तसा त्यांच्या आप्तांना, मित्रांना आणि भक्तांना त्यांचा फार दरारा वाटे. टिळकांच्या जवळ जाणे किंवा टिळकांची सलगी करणे हे सूर्याशी लगट करण्याइतके अशक्य आहे असे सर्व समजत असत. टिळकांचे सारे आयुष्य राजकारणाने व्यापून गेलेले होते. ते जेव्हा मोकळे असत तेव्हा सरकारशी झगडत असत. आणि ते जेव्हा झगडत नसत, तेव्हा ते सरकारच्या तुरुंगात असत. याखेरीज ग्रामण्य प्रकरण, बापट कमिशन किंवा ताईमहाराजांचा खटला असे अनेक उपटसुंभ व्याप त्यांच्यामागे लागलेले असत. त्यामुळे टिळकांच्या आयुष्याला एवढे सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले होते, की त्यांच्या जीवनाला दुसरी वैयक्तिक किंवा कौटुंबिक बाजू असेल याची लोकांना कधी कल्पनाच येऊ शकली नाही. टिळकांचा स्वभाव भांडखोर, आग्रही, कठोर आणि तापट असावा असे सामान्यतः लोक समजत. त्यात त्यांच्या रागीट आणि गंभीर चेहऱ्यामुळे लोकांच्या या समजुतीला अधिकच पुष्टी मिळे. शिवाय वेद, उपनिषदे, गीता, ज्योतिष आणि गणित हे त्यांच्या आवडीचे विषय महशूर होते. त्यामुळे त्यांचा स्वभाव रुक्ष, नीरस आणि भावनाशून्य असला पाहिजे, असेच इतरांना वाटे. टिळकांच्या स्वभावाबद्दल ही जी लोकांची सर्वसामान्य समजूत आहे तीच माझीही पण आजपर्यंत होती. पण परवा ‘टिळक चरित्रा’ मधून इतस्ततः वावरताना त्यांच्या स्वभावातले जे एक मनोहर दालन मला पहावयाला मिळाले ते बघून मी तर अगदी दिपूनच गेलो.

बाहेरून पर्वताप्रमाणे अभेद्य आणि कठोर दिसणाऱ्या या महात्म्याच्या हृदयात खरोखरच कौटुंबिक प्रेमाचा निर्मळ आणि विशुद्ध झरा असलेला बघून माझे हृदय भरून आले. त्यातल्या त्यात टिळकांना आपल्या पत्नीबद्दल जे प्रेम वाटत होते ते पाहून तर डोळ्यात आसवेच उभी राहिली. गांधीजी आणि कस्तुरबा यांची परस्परनिष्ठा लोकांना माहीत आहे. पण लोकमान्य टिळकांना आपल्या पत्नीबद्दल काय वाटत होते याची कोणालाही आजपर्यंत फारशी कल्पना नव्हती. वैयक्तिक प्रेमाबद्दल शक्य तितके कमी बोलणे हा मराठी मनाचा धर्म आहे. त्यातल्या त्यात टिळक अशा काळात आणि अशा पिढीत जन्माला आलेले होते की त्या वेळी नवऱ्याने बायकोचे नाव घेणे किंवा तिच्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करणे या गोष्टी गृहस्थाच्या कुटुंबात भलेपणाच्या समजल्या जात नसत. म्हणून त्या काळातील कोणत्याही पुरुषाला आपल्या पत्नीबद्दल काय वाटत असावे हे इतरांना कळण्याचा काहीच मार्ग नसे. टिळक सहा वर्षांच्या काळेपाण्यावर गेले नसते तर त्यांनी ‘गीतारहस्य’ लिहिले नसते हे जसे खरे, त्याचप्रमाणे टिळक सहा वर्षे आपल्या कुटुंबापासून दूर राहिले नसते तर त्यांच्याबद्दल त्यांना काय वाटत होते हे जगाला कधीही कळून आले नसते. मंडाले येथून टिळकांनी आपल्या घरी सहा वर्षांत जी अनेक पत्रे पाठविली, त्यांत टिळकांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याचे अत्यंत तेजस्वी स्वरूप प्रकट झाले आहे. या पत्रांचा आधार घेऊनच आम्ही हे लिहित आहोत. रामभाऊ आणि बापू या आपल्या दोन पुत्रांच्या शिक्षणाची आपल्यामागे यत्किंचितही हयगय होऊ नये याची टिळकांना सारखी तळमळ लागून राहिलेली होती.‘माझ्या दुर्दैवामुळे त्यांच्या शिक्षणाची हानी का व्हावी?' असे तुरुंगातून पाठविलेल्या पहिल्याच पत्रात ते म्हणतात. आपल्या मुलांच्या सहामाही आणि वार्षिक अभ्यासाची प्रगतिपुस्तके टिळक मंडाले तुरुंगात मागवून घेत. यापेक्षा अधिक ते काय सांगावेआपल्या मुलांनी व्यायाम कोणता करावाकॉलेजमध्ये गेल्यावर संस्कृत भाषा घ्यावी की पाली भाषा घ्यावीअभ्यास करावयाचा तो कोणत्या पद्धतीने करावा इतक्या बारीकसारीक गोष्टी टिळक तुरुंगामधून पत्राने घरी कळवीत असत. तथापि, टिळकांना आपल्या पत्नीबद्दल काय वाटत होतेएवढेच आम्हाला या लेखात सांगावयाचे आहे. म्हणून निरनिराळ्या तारखेच्या निरनिराळ्या पत्रातून टिळक आपले भाचे धोंडोपंत विद्वांस यांना लिहितात, " सौभाग्यवतीच्या प्रकृतीची काळजी वाटते, तरी ती कशी आहे ते लिही. तिला मधुमेहावरील वैद्य पदे यांचे औषध देऊन पाहा...... सौभाग्यवती व मुले यांना म्हणावे की मला माझी काळजी वाटत नाही. त्यांचीच अधिक वाटते. माझी प्रकृती खरोखरच बरी आहे. त्यांना बरे वाटावे म्हणून उगाच काहीतरी लिहितो असे नाही. मी लौकरच येऊन भेटेन असे त्यांना सांगावे. दुःखात आशा हीच जगण्याची जागा. म्हणून ती त्यांची आशा कायम राहील अशाविषयी काळजी घ्यावी....

सौभाग्यवतीला आपला जुना सप्तरंगीचा काढा करून देत जा. टिंक्चर तितके उपयोगी पडत नाही. सप्तरंगीची चांगली पूड करावी, तोळा अर्धा तोळा पाण्यात टाकावी आणि काढा वस्त्रगाळ न करता तसाच घ्यावा. त्याचा उपयोग अधिक होईल.... सौभाग्यवतीच्या मधुमेहाविषयी पुरी हकीगत कळवावी. तिचीच काळजी मला अधिक वाटते. घरी कुटुंबाला व मुलांना माझी पत्रे वाचून समजावून सांगत जा. त्यांना म्हणावे, धीर धरा, आनंदात राहा. आपल्याला काळ तूर्त प्रतिकूल आहे. पण त्याला बिनतक्रार मान हलवून पुढे दिवस चांगले येतील अशी आशा करीत राहणे हाच खरा मार्ग.... सौभाग्यवतीची प्रकृती मे-जुनेमध्ये बिघडल्याचे ऐकून वाईट वाटले. मधुमेहाचा विकार मोठा दुष्ट आहे. पण तिने धीर धरून कसेतरी दिवस काढले पाहिजेत. इलाज नाही. प्रसंग परीक्षा पाहणारच आहे परंतु त्यातही आनंदानेच राहिले पाहिजे....      सौभाग्यवतीची प्रकृती उन्हाळ्यात बिघडण्याचा संभव आहे. तिला म्हणावे, मुलांना घेऊन काही दिवस सिंहगडावर जा. तिला थंड हवेचे सौख्य नको असेल. पण उन्हाळ्याने तिची प्रकृती बिघडते. म्हणून म्हणावे की माझ्याकरिता म्हणून तरी सिंहगडावर जा. माझी  ही आज्ञा असे म्हणून ती नाखुषीने वर गेली तरी मला ते हवे आहे. धुमेहाच्या रोग्यांना सिंहगडाची हवा बरीच मानवते.... सौभाग्यवतीची प्रकृती अधिक बिघडली नाही इतके तरी समाधानच आहे. दोघी मुली जवळ असल्याने तिच्या मनाला थोडे करमेल. तिला म्हणावे, दुर्दिन जात आहेत, लौकरच संपतील... सौभाग्यवतीची प्रकृती बरी असल्याचे कळले. तिला म्हणावे, आपण आणि दुर्दैव यांची टक्कर जुंपलेली आहे. त्यातून कोणीतरी एक हरणार व एक जिंकणार. अर्थात आपण हार न जाण्याचा निश्चय केला तर आपणच जिंकू... सौभाग्यवतीची प्रकृती बरी असल्याचे वाचून समाधान झाले. ती घरकाम करू शकते हे वाचून बरे वाटले.... माझ्याप्रमाणे सौभाग्यवतीलाही सातूच्या पिठाबरोबर दूधतूप घेण्यास सांगावे, डॉ. मुंजे यांच्या औषधाचा एक महिन्यानंतर विचार करू." नऊ सालच्या जानेवारीपासून तो बारा सालच्या मे अखेरपर्यंत म्हणजे जवळजवळ तीन वर्षे पाच महिनेपर्यंत तुरुंगातून पाठविलेल्या टिळकांच्या पत्रांमध्ये त्यांच्या पत्नीबद्दलचे हे एवढे उल्लेख आढळतात. हे उल्लेख जरी थोडे आणि त्रोटक असले तरी त्यामधून टिळकांना आपल्या पत्नीबद्दल केवढे अपरंपार प्रेम होते हे ज्यांना हृदय आहे त्यांना सहजच कळून येईल. त्यामधली काही काही वाक्ये वाचताना तर काळजात अगदी गलबल्यासारखे होते.

बारा सालच्या सात जूनला सौ. सत्यभामाबाई टिळक पुणे येथे वारल्या. टिळक तिकडे हिंदुस्थानाबाहेर ब्रम्हदेशातील एका तुरुंगात खितपत असताना इकडे त्यांच्या पत्नी घरी मरण पावाव्यात ही टिळकांच्या आयुष्यातील एक अत्यंत हृदयद्रावक घटना होय. पत्नीच्या मृत्यूची तार हाती येताच टिळकांना केवढे दुःख झाले ते वर्णन करून सांगता येणार नाही. त्या प्रसंगी टिळकांनी घरी जे पत्र लिहिले त्यावरून त्यांच्या दुःखाच्या तीव्रतेची कल्पना येते. मराठी
वाङ् मयात इतके हृदयभेदक पत्र आम्ही वाचलेले नाही. हे पत्र वाचून ज्याच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहणार नाहीत असा मनुष्य विरळा. महापुरुषाचे दुःख आणि शोकही केवढा मोठा असतो हे या पत्रावरून कळून येते. शोकरसाने ओथंबलेले टिळकांचे हे लहानसे पत्र हा त्यांच्या अमर वाङ् मयाचा एक उज्ज्वल नमुना आहे असे आम्हाला वाटते. 
'गीतारहस्यलिहिणाऱ्या एका थोर तत्त्वज्ञानी लेखकाने हे पत्र लिहिले आहे हे लक्षात घेतले म्हणजे मन थक्क होते. एखाद्या भावनाप्रधान आणि प्रतिभाशाली कवीने आपल्या मृत प्रेयसीसाठी केलेला निरर्गल शोक निराळा आणि एकाद्या बुद्धिवान आणि व्यवहारी माणसाने आपल्या मृत पत्नीबद्दल थोडक्या शब्दात आपले अंतःकरण प्रकट केलेले निराळे! संयमी आणि जबाबदार अशा संसारी माणसाच्या समजूतदार शोकाचा हा नमुना जगाच्या वाङ् मयात तरी अद्वितीय आहे. ते पत्र असे 

“तुमची तार पोचली. मनाला फार मोठा जबर धक्का बसला. संकटे आली तर मी ती शांतपणे सोशीत असतो हे खरे. पण खरेच सांगतो की या बातमीने मात्र मी हादरून गेलो. आपण हिंदू लोक. तेव्हा नवऱ्याच्या आधी बायको गेली हे व्हावे तसेच झाले असेच कोणीही म्हणणार. पण तिच्या मरणकाळी मी जवळ नाहीइतकेच नव्हे तर बंदिवासात असावे याचेच फार दुःख वाटते. पण ते होणारच होते. भवितव्यतेला कोण काय करणार हीच भीती मला राहून राहून वाटे. आणि शेवटी तसेच घडलेही. पण माझे दुःखकारक उदासपणाचे विचार आणखी सांगून तुम्हांला अधिक कष्टी करू इच्छित नाही. माझ्या जीविताचा एक भाग समाप्त झाला. दुसराही आता लौकरच समाप्त होईल असे वाटते. तिची उत्तरक्रिया यथासांग करावी व तिच्या इच्छेप्रमाणे अस्थी प्रयाग किंवा काशी येथे गंगेत टाकाव्या.तिच्या तोंडून अखेरच्या म्हणून इच्छा प्रकट झाल्या असतील, त्या शब्दशः अवश्य पाळाव्यात. मुलांची प्रकृती व त्यांची विद्या यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आता तुमच्या एकट्यावर पडली आहे. मी नसल्यामुळे मुलांना तिच्या मरणाचे दुःख अधिकच झाले असेल. माझा म्हणून त्यांना निरोप सांगणे की, या दुःखामुळे विद्येची हानी होऊ देऊ नका. त्यांच्याहूनही मी लहान होतो, तेव्हा माझे वडील, मातुश्री दोघेही निवर्तली. असल्या संकटातसुद्धा मनुष्याने स्वावलंबनच अधिक शिकले पाहिजे. आपल्यावर आलेले मानहानी चे संकट ईश्वरी अवकृपेमुळे आले असे मुलांनी मानले तर ईश्वर त्यांना दूर नाही. दुःख करीत बसून कोणीही काळाचा दुरुपयोग करू नये. होणारास   धिटाईने तोंड द्यावे. तिची जी काही चीजवस्तू असेल त्याची यादी करा. त्या सर्व नीट कुलुपात ठेवून जे काय त्याचे करावयाचे ते मी सांगेन किंवा लिहीन. मुलांनाही आता अशा आणीबाणीच्या वेळी तुमच्याशिवाय दुसरा आधार नाही, म्हणून ईश्वराने तुम्हाला बळ द्यावे याहून इतक्या दुरून मी तरी त्याला अधिक काय विनविणार!” टिळकांच्या राजकीय पराक्रमाचे गंभीर चौघडे इतकी वर्षे आपल्या कानात घुमत असल्यामुळे त्यांच्या जीवनातल्या सात्त्विक प्रेमाच्या सनईचे हे कोमल सूर आपल्याला आतापर्यंत ऐकू आले नसावेत !

 

 

Advertisement

  • even news-new
  • even news-new