आचार्य अत्रे यांच्या दुर्वा आणि फुले या लेखसंग्रहातून --- लोकमान्य टिळक (१)

लोकमान्य टिळक (१)

आज एक ऑगस्ट, एक ऑगस्ट ही तारीख कानावर आली किंवा या तारखेची आठवण झाली म्हणजे एकच महान विभूती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते, आणि ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची. वीस सालच्या एक ऑगस्टला रात्रौ बारा वाजून चोवीस मिनिटांनी मुंबई येथे सरदारगृहात लोकमान्य टिळक यांचे अवसान झाले. त्या गोष्टीला आज सत्तावीस वर्षे झाली.टिळकांच्या मरणाचे आणि त्यांच्या विराट स्मशानयात्रेचे ते हृदयभेदक दृश्य अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे. जणू काही कालच ती गोष्ट घडली असे मला वाटते. मी त्या वेळी मुंबईत होतो. "माधवाश्रमा" शेजारच्या एका इमारतीत राहत होतो. म्हणून त्या अलौकिक राष्ट्रपुरुषाचे अंत्यदर्शन घेण्याचे महद् भाग्य त्या वेळी मला लाभले. आज सकाळपासून सत्तावीस वर्षांपूर्वीच्या त्या शोकदायक दिवसाची आठवण मला होते आहे. त्याखेरीज दुसरा कोणताही विचार आज माझ्या मनामध्ये नाही. किंवा दुसरा कोठलाही विषय सुचण्याच्या मनःस्थितीत मी या वेळी नाही. म्हणून वाचकहो, त्या अविस्मरणीय दिवसाबद्दलच मी आज तुमच्याशी बोलावयाचे ठरविले आहे. टिळक त्या वेळी चौसष्ट वर्षांचे होते. सहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर ते जरी थकल्यासारखे दिसत होते, तरी त्यांची प्रकृती तशी काही वाईट नव्हती. त्यांचा आवेश आणि अवसान पूर्वीपेक्षा जास्त प्रखर झालेले होते.

Read more...

आचार्य अत्रे यांच्या दुर्वा आणि फुले या लेखसंग्रहातून --- लोकमान्य टिळक (२)

 

लोकमान्य टिळक (२)

महापुरुषांबद्दल आदर जसा मोठा तसा त्यांच्याबद्दलचा गैरसमजही मोठा. पंचमहाभूतांचे गुणधर्म जसे प्रसिद्ध आहेत तसे महापुरुषांचे स्वभावधर्मही ठरलेले असतात. त्यांच्या गंभीर स्वभावाला दुसा-याही अनेक कोमल बाजू असू शकतात याची सामान्यजनांना कल्पना नसते. अग्नी हा दाहक असतो; पण अग्नी हा शीतल असतो का ? पर्वत हा कठोर आणि उत्तुंग असतो; पण पर्वत हा कोमल असतो का ? सिंह हा क्रूर आणि शूर असतो; पण सिंह हा प्रेमळ असतो का ? लोकमान्य टिळकांचे चरित्र मी परवा वाचीत होतो. ते वाचून हे विचार माझ्या मनात आले. सामान्यतः टिळकांची आठवण झाली म्हणजे डोळ्यापुढे सिंहाची मूर्ती उभी राहते. खरोखर टिळक हे सिंहाप्रमाणे शूर, पराक्रमी आणि निधड्या छातीचे होते. जनतेच्या हृदयावर राज्य करण्यासाठीच ते जणू काही जन्माला आले होते. शत्रूंना जसे त्यांचे भय वाटे; तसा त्यांच्या आप्तांना, मित्रांना आणि भक्तांना त्यांचा फार दरारा वाटे. टिळकांच्या जवळ जाणे किंवा टिळकांची सलगी करणे हे सूर्याशी लगट करण्याइतके अशक्य आहे असे सर्व समजत असत. टिळकांचे सारे आयुष्य राजकारणाने व्यापून गेलेले होते. ते जेव्हा मोकळे असत तेव्हा सरकारशी झगडत असत. आणि ते जेव्हा झगडत नसत, तेव्हा ते सरकारच्या तुरुंगात असत. याखेरीज ग्रामण्य प्रकरण, बापट कमिशन किंवा ताईमहाराजांचा खटला असे अनेक उपटसुंभ व्याप त्यांच्यामागे लागलेले असत. त्यामुळे टिळकांच्या आयुष्याला एवढे सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले होते, की त्यांच्या जीवनाला दुसरी वैयक्तिक किंवा कौटुंबिक बाजू असेल याची लोकांना कधी कल्पनाच येऊ शकली नाही. टिळकांचा स्वभाव भांडखोर, आग्रही, कठोर आणि तापट असावा असे सामान्यतः लोक समजत. त्यात त्यांच्या रागीट आणि गंभीर चेहऱ्यामुळे लोकांच्या या समजुतीला अधिकच पुष्टी मिळे. शिवाय वेद, उपनिषदे, गीता, ज्योतिष आणि गणित हे त्यांच्या आवडीचे विषय महशूर होते. त्यामुळे त्यांचा स्वभाव रुक्ष, नीरस आणि भावनाशून्य असला पाहिजे, असेच इतरांना वाटे. टिळकांच्या स्वभावाबद्दल ही जी लोकांची सर्वसामान्य समजूत आहे तीच माझीही पण आजपर्यंत होती. पण परवा ‘टिळक चरित्रा’ मधून इतस्ततः वावरताना त्यांच्या स्वभावातले जे एक मनोहर दालन मला पहावयाला मिळाले ते बघून मी तर अगदी दिपूनच गेलो.

Read more...

आचार्य अत्रे यांच्या दुर्वा आणि फुले या लेखसंग्रहातून --- लोकमान्य टिळक (३)


लोकमान्य टिळक (३)

लोकमान्य टिळकांचे आयुष्य अनेक नाट्यपूर्ण प्रसंगांनी भरलेले आहे. अर्थात हे सारे प्रसंग वीररसाचे आणि उदात्तरसाचे आहेत. दुसऱ्या रसाला त्यांच्या झुंजार जीवनात मुळी जागाच नव्हती. पण असे असूनही त्यांच्या आयुष्यात एकदा एक मौजेचे हास्यरसपूर्ण प्रकरण घडले. त्याची आठवण झाली म्हणजे मला खूपच हसू येते. खरोखर, आमचे पुणे म्हणजे एक अजब गाव आहे. ह्या गावात आजपर्यंत एकाहून एक विक्षिप्त अशा काय काय अद्भुत वल्ली जन्माला येऊन गेल्या असतील म्हणता ! त्या सगळ्यांचा इत्यंभूत इतिहास एकदा कोणीतरी लिहिण्यासारखा आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात पुणे शहरात एक अशीच विचित्र व्यक्ती होती. हिचे नाव बाळासाहेब नातू. त्या वेळी पुण्यात दोन नातू प्रसिद्ध होते. एक बाळासाहेब व दुसरे तात्यासाहेब. तसे दोघेही ‘नातू’ काही अगदीच ‘बाळाजीपंत नांतू’ च्या वंशात शोभण्यासारखे नव्हते. दोघांच्याही मनात देशाबद्दल अतोनात प्रेम होते. इंग्रजांची सत्ता ह्या देशातून नाहीशी व्हावी असे दोघांनाही तळमळीने वाटत होते. विशेषतः तात्यासाहेब हे जास्त जहाल होते. ते घोड्यावर बसण्यास मोठे पटाईत होते. गावातील निवडक तरुण जवानांना जमा करून त्यांना घोड्यावर बसावयाला शिकवण्याचा त्यांना अतिशय नाद होता. सरकारविरुद्ध बंड करण्याकरिता शस्त्रास्त्रांचा गुप्त साठा कोठेतरी ते करून ठेवीत असावेत असा सरकारला वहीम आलेला होता. म्हणूनच अठराशे सत्त्याण्णव सालच्या जूनमध्ये पुण्यात रँडसाहेबाचा खून झाल्यानंतर अठराशे सत्तावीसच्या पंचविसाव्या कलमान्वये दोघाही नातूंना चौकशी न करता सरकारने कित्येक महिने डांबून ठेवले होते. त्या त्यांच्या अटकेचा त्या वेळी विलायतेपर्यंत फार मोठा गवगवा झाला. तेव्हा तसे म्हणाल तर हे नातूद्वय मोठ्या निधड्या छातीचे होते.

Read more...

 

Advertisement

  • even news-new
  • even news-new